हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. “भाजपच्या नोटा महाराष्ट्रातून गोव्यात फार येत आहेत. फडणवीस हे आता गोव्याला आता जायला लागले आहेत. त्यांच्या डोक्यात नोटा नोटा असल्याने त्याचे प्रताप आता दिसत आहेत. भाजपला स्वबळावर आतापर्यत सत्ता मिळवता आली नाही. त्यांनी जनमताची चोरी करून या ठिकाणी सत्ता मिळवली, असा थेट आरोप करीत राऊतांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यात आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जात आहेत. त्याच्या पूर्वीपासून मी गोव्यात जात आहे. आम्हाला माहिती आहे कि गोव्यात भाजपने कशा प्रकारे सत्ता मिळवली आहे. गोव्यात सध्या भाजपकडून महाराष्ट्रातून नोटा पाठवल्या जात आहेत. या ठिकाणी भाजपला आतापर्यत स्वबळावर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत नोटांच्या साह्याने जनमतांची चोरी करून निवडणूक जिकल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, या ठिकाणी निवडणुकीत शिवसेनेना तब्बल 50 ते 100 जागा लढवणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहे. उत्तर प्रदेशच्या कोणत्या भागात किती उमेदवार उतरवायचे याचा निर्णय घेतला जाईल. शिवसेनेचे उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्व दाखवले पाहिजे. एका लढ्यातील हा एक पक्ष आहे. उत्तर प्रदेशची ही गरज आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्व खासदार, पक्षाचे प्रमुख लोक यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.
काँग्रेसपुढे आम्ही झोळी घेऊन गेलो नाही – राऊत
आज घेतलेल्या अपत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात काँग्रेस पक्षाबरोबरच्या आघाडीबाबतही मत मांडले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात एकत्र लढण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता. राहुल गांधी यासाठी सकारात्मक आहेत पण गोव्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे हे मला माहिती नाही. 40 पैकी 30 जागा काँग्रेसलेल्या लढण्यास आम्ही सांगितले आहे. उरलेल्या 10 जागांवर मित्र पक्षांना लढण्याची संधी द्या. काँग्रेस गेल्या 50 वर्षात ज्या जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितल्या आहेत. काँग्रेसच्या खिशातल्या जागा आम्ही मागितलेल्या नाहीत, असे राऊत यावेळी म्हणाले.