पाठीवर थाप मारल्याने खून करणारे पती-पत्नी गजाआड 

औरंगाबाद – मद्य प्राशन केल्यानंतर पाठीवर थाप टाकल्याचा जाब विचारताच लक्ष्मण चव्हाण (30, रा. सुदर्शननगर, अकोट, जि. अकोला) या युवकाचा खून केल्याचा प्रकार 13 मार्च रोजी मिटमिटा परिसरात घडला होता. या प्रकरणातील फरार पती पत्नीला सहा महिन्यांनी छावणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय ऊर्फ संजू गोलू काळे (28) आणि उषा संजय काळे (दोघे रा.मिटमिटा तलावाजवळ) अशी त्या आरोपी पती पत्नीची नावे असून रांजणगाव परिसरात नातेवाईकांना भेटायला येताच घेराव टाकून पोलिसांनी पती पत्नीला मंगळवारी बेड्या ठोकल्या.

छावणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पांडूरंग भागिले यांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव, मिटमिटा परिसरात पाठीवर थाप मारल्यावरून लक्ष्मण रघुनाथ चव्हाण याचा 13 मार्च रोजी खून करण्यात आला होता. लक्ष्मण चव्हाण, संजय काळे आणि अन्य काहीजण दारू पित बसले होते. काही वेळाने लक्ष्मण चव्हाण तेथून घराकडे निघाला. तेव्हा संजय काळे याने लक्ष्मण चव्हाणच्या पाठीवर थाप मारली. लक्ष्मणने त्याचा जाब विचारला असता त्यावरून त्यांच्यात कुरबुर झाली. याचा राग मनात धरून संजय काळेने काही वेळानंतर लक्ष्मणच्या पोटात चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी केले. हा प्रकार समजल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने संजयची पत्नी उषा हिने लक्ष्मणला घाटीत दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले होते. या प्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान संजयच्या पत्नीने मृत लक्ष्मण हा घरातच धारदार वस्तूवर पडल्याने गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. घटनेनंतर तेव्हापासून काळे दांमत्य पसार होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. काळे दाम्पत्यावर चोरीचे गुन्हेही दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उषा काळे हिने जखमी लक्ष्मण चव्हाणला घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित करताच ती पसार झाली होती. तत्पूर्वी तिने पतीला वाचविण्यासाठी घाटी रुग्णालयात लक्ष्मण रघुनाथ चव्हाण, असे खरे नाव न सांगता लक्ष्मण बारकू काळे असे खोटे नाव सांगितले होते. तसेच तो घरी टोकदार वस्तूवर पडल्यामुळे जखमी झाल्याचा बनाव केला होता. एवढ्यावरच न थांबता तिने स्वतःचे नावदेखील उषा संजय काळे असे न सांगता पूजा यश काळे असे खोटे सांगितले होते. मृत लक्ष्मण चव्हाणचा भाऊ भिसन चव्हाण याने दिलेल्या तक्रारीनंतर उषाचा बनाव उघडकीस आला होता. त्यामुळे या गुन्ह्यात उषा काळे हिलादेखील आरोपी करून अटक केली आहे. तसेच खुनातील फरार आरोपी संजय काळे हा रांजणगाव शेणपुंजी येथे चौकात उभा असल्याची खबर छावणी ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांना मिळाली. त्यावरून त्यांच्यासह पोलिस नाईक अशोक नागरगोजे हे रवाना झाले. त्यांनी आरोपीचा शोध घेतला. एकतानगर चौकात तो दिसताच पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहायक आयुक्त विवेक सराफ, निरीक्षक शरद इंगळे, सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे, सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.