लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील शाहजहांपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने माणुसकीची, क्रूरतेची मर्यादाच ओलांडली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीवर उकळतं पाणी टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामागचे संतापजनक कारण समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
या पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेच्या अंगावर उकळतं पाणी पडल्याने हि महिला वाईटरित्या जळाली असून तिची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. 2013 मध्ये पीडित महिलेचं लग्न झालं होतं. या महिलेला तीन मुली आहेत.सर्वात लहान मुलीचा जन्म एक वर्षापूर्वी झाला होता. मुलगा होत नसल्याने आरोपी सत्यपालचा पत्नीवर राग होता.
तसेच आरोपी महिलेला माहेरहून 50000 रुपये आणण्यासाठी दबाव आणत होता. तो पत्नीला नेहमी त्रास द्यायचा, तिला जेवणही दिलं जात नव्हतं. पीडित महिलेच्या वडिलांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा आरोपी फरार असून त्याला लवकरच ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.