पर्यटकांसाठी खुशखबर : जागतिक वारसा स्थळ असणारे कास पुष्प पठार 25 ऑगस्टपासून खुले होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जागतिक वारसा स्थळ असणारे कास पुष्प पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग जावली – सातारा यांच्या संयुक्त बैठकीत बुधार दि. 25 ऑगस्टपासून हा निर्णय घेण्यात आला. कास पठारावर विविध रानफुलांचा रंगोत्सव सुरू झाला असल्याने पठार विविध फुलांनी बहरणार आहे. त्यामुळे हा फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांना सुवर्णसंधी मिळणार आहे.

कास पठार येथे आयोजित बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, जावली वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनरक्षक नीलेश रजपूत, वनरक्षक स्नेहल शिंगारे, सर्व समिती सदस्य उपस्थित होते. महाबळेश्वर – पाचगणी खुले झाल्याने कास लवकर खुले व्हावे, अशी अपेक्षा पर्यटकांमधून व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीबाबत उत्सुकता होती. बैठकीत कोरोना आणि इतर परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत दि. 25 ऑगस्टपासून पर्यटकांसाठी कास पठार खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कास पठारावर ऑनलाईन नोंदणीची अट असणार आहे. याठिकाणी ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुलांचा बहर मोठ्या प्रमाणात येत असतो. दरम्यान, कास पर्यटन हंगामासाठी एकूण 120 कर्मचारी घेण्याचे ठरले असून प्रत्येक गावातून तीन महिला कर्मचारी घेण्याचे देखील बैठकीत निश्चित करण्यात आले. तिकीट दर पाच वर्षांवरील सर्वांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी 100 रुपये असणार आहे.

ऑनलाईन बुकिंग असेल तरच प्रवेश अन्यथा नाही

ऑनलाईन बुकिंग करून आलेल्या पर्यटकांनाच फुले पाहता येणार आहेत. ऑफलाईन येणार्‍या पर्यटकांना फुले पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक दिवशी फक्त तीन हजार पर्यटकांनाच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. समितीमार्फत कायमस्वरूपी पर्यटनासाठी एक मिनी बस खरेदी करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी चिठ्ठी पध्दतीने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी करण्यात आल्या. मारुती विष्णू चिकणे यांची चिठ्ठी पद्धतीने अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून कास गावचे दत्तात्रय सीताराम किर्दत यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचलन सोमनाथ जाधव यांनी केले.

Leave a Comment