हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूकीमध्ये ग्रामपंचायत प्रवर्गातून स्वाती आदेश जमदाडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान अर्ज छाननीत निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. याच्या निषेधार्थ स्वाती जमदाडे यांचे पती शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे खंडाळा तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
शासनाच्या चूकीच्या धोरणामुळे व अधिसुचनेमुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे, असे सांगत आदेश जमदाडे यांनी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यालयात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतले. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडून गेला. यावेळी त्या ठिकाणी सहाय्यक निबंधक देविदास मिसाळ, ज्ञानेश्वर चव्हाण हे उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे खंडाळा तहसिलदार कार्यालयात व सहाय्यक निबंधक कार्यालयात खळबळ उडाली आहे.