नांदेड प्रतिनिधी | पती आणि पत्नी जीवनाचे सोबती असतात. एकमेकांच्या सानिध्यात जीवन सुखकर बनवत आपला संसार सुखाचा बनवण्याचे उद्दिष्ट घेऊन ते विवाह बद्ध झालेले असतात. मात्र एक कारण त्यांचे जीवन उजाड बनवून जाते. ते कारण म्हणजे चारित्र्यावरून घेतला जाणारा संशय. चारित्र्यावरून संशय घेऊन पतीला क्रूर पणे मारल्याची घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील तळेगाव ता. उमरी या गावी पत्नीने पतीला चरित्रावरून संशय घेतो या कारणाने विजेचा शॉक देऊन मारण्याची घटना घडली आहे. भीमराव नागोराव हैबते (४२ ) असे मेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हि घटना शनिवारी रात्री १२. ३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भीमराव हैबते आपली पत्नी आम्रपाली आणि मुलांसोबत शनिवारी रात्री घरी होते . यावेळी चारित्र्यावर संशय घेऊन भीमरावाचा पत्नीसोबत वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दररोजच्या या प्रकाराने कंटाळून आम्रपालीने शेवटी पतीला संपविण्याचा निर्णय घेतला. घराबाहेरील पत्र्याच्या शेडमधील वायर तिने काढले. घरात येत भीमराव यास वीज प्रवाह चालू असलेल्या या वायरने शॉक दिला. यातच भिमरावचा अंत झाला. यानंतर सकाळी ही माहिती लपविण्यासाठी आम्रपालीने बनवाबनवी करून पोलिसांना चुकीची माहिती दिली. मात्र मयत भीमरावची बहीण जयशीला गौतम चव्हाण हिला घटनेबाबत संशय आल्याने तिने आज सकाळी उमरी पोलिसात तक्रार केली.
पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली . अगोदर आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. त्यावरून ही घटना उघडकीस आली. पतीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आम्रपाली हिच्याविरुद्ध उमरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.