बळीराजाला वाचावा! शरद पवारांनी केली मोदींकडे पत्रातून मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना आणि लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन करणार एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. लॉकडाउनचा आर्थिक फटका शेती क्षेत्राला सुद्धा बसला आहे. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही त्यामध्ये शेतकऱ्यांबाबत म्हणाव्या तशा काही ठोस तरतुदी नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शरद पवार यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत.

आपल्या देशात कोरोनाची साथ पसरली आहे. तसंच लॉकडाउन जाहीर करुन आता ५५ दिवस होत आहेत. अशावेळी मनोधैर्य हरवलेल्या आणि नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना उभारी देणं गरजेचं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. सध्या आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था ही कोरोना संकटामुळे आणि लॉकडाउनमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा तोंडावर असताना शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी विनंती मी आपल्याला पत्राद्वारे करतो आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी पत्रातून मांडले ‘हे’ मुद्दे

१) शेती क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी १.६३ लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं हा भाग २० लाख कोटींच्या पॅकेजचा विचार करता ८ टक्के इतका होता.

२) शेतीसंबंधीच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं. मात्र त्यासाठी लागणारा कालावाधी हा मोठा आहे. सध्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. करोना नावाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशात मागणी कमी झाली आहे, अडचणी येत आहेत त्याबाबत विचार व्हावा

३) जे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे तातडीची मदत मिळणार नाही. ज्यांना तोटा सहन करावा लागला आहे त्या शेतकऱ्यांचं काय? लॉकडाउनमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे त्याचं काय? अशा काळात त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. खरिपाच्या दृष्टीने त्यांना नियोजन करता येईल यासाठी केंद्राने प्रयत्न केले पाहिजेत

४) पशूपालन, मत्स्य व्यवसाय, लघु उद्योग, मधमाशी पालन यांच्यासाठी जे पॅकेज जाहीर करण्यात आलं त्याबाबत सरकारने अधिक स्पष्टता द्यावी.

५) सध्या कृषी क्षेत्रात काम करणारा प्रत्येक माणूस हा एक प्रकारच्या नैराश्याखाली जगतोय. तोटा सहन करुन नैराश्यात दिवस काढणाऱ्या शेतकऱ्याला तातडीची मदत देऊन दिलासा देण्याचं काम मोदी सरकारने केलं पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment