हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्ष व्हावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी भाजप विरोधात एकत्र यावे अस आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली.
एका बाजूला संजय राऊत यांच्याकडून जोरदार बॅटिंग सुरू असताना आता खुद्द शरद पवारांनी यावर भाष्य करताना स्ट्रेट ड्राईव्ह लगावला आहे. ‘यूपीएचा अध्यक्ष होण्यात मला कोणताही रस नाही. माझ्या नावावरून अनावश्यक वाद निर्माण केला जाऊ नये. मी यूपीएचं अध्यक्ष व्हावं, हे शिवसेनेचं मत आहे. माझं नाही,’ आमच्या पक्षाची ती भूमिका नाही. इतरांनीही माझं नाव यात ओढू नये,’ असं पवार म्हणाले.
नक्की काय म्हणाले होते संजय राऊत –
शरद पवार हे यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं शिवसेनेन याआधीच स्पष्ट केलं आहे. पक्षाचं मुखपत्र ‘सामना’च्या शनिवारच्या अग्रलेखात पुन्हा एकदा शिवसेनेनं पवारांच्या नेतृत्वाचं गुणगान केलं होतं. भाजपशी लढण्यासाठी यूपीएला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधी संघर्ष करणारे नेते असले तरी त्यांना आवश्यक ती साथ मिळत नाही, असं नमूद करत, शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे पवारांच्या नावाकडं अंगुलीनिर्देश केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’