सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- पुणे जिल्ह्याच्या सीमेवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाबंदी करण्यासाठी प्रशासनाने चेकनाका उभारला आहे. त्यामुळे विनापरवानगी येण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. शिरवळ पोलिसांनी सातारा- पुणे हद्दीवर चेकनाका उभारला विनापरवानगी जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, त्यासाठी आता ई- पासची गरज आहे. सातारा जिल्ह्यातील सीमावर पोलिसांची नाकाबंदी केलेली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा वाढता दर कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंतरजिल्हा प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात येणार असाल तर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याकरिता प्रतिबंध करण्यात आला आहे.
अत्यावश्यक कारणाशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये नागरिकांनी व वाहनांनी प्रवेश करू नये, याकरिता सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या व पुणे-सातारा जिल्ह्यांच्या हद्दीवर शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चेकनाका उभारण्यात आला आहे. याठिकाणी शिरवळ पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या पुलावरून विनाकारण व विनापास नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात खालील ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी
सातारा जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी सातारा- पुणे मार्गावर शिरवळ पूलावर चेकनाका, कराड- सांगली मार्गावर मालखेड चेकनाका, कराड-उंडाळे- शेडगेवाडी मार्गावर चेकनाक, कडेगांव- कराड मार्गावर सुर्ली घाटात चेकनाका, लोणंद- निरा पुलावर चेकनाका, फलटण- बारामती येथे सांगवी पुलावर चेकनाका याशिवाय कोकणातून कोयनानगर येथे घाटात चेकनाका तसेच कराड- पलूस मार्गावर किल्लेमच्छिंद्रगड येथे चेकनाका व महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरही चेकनाका येथे पोलिस नाकाबंदी करत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा