सोलापूर | इंदापूर पाणी नेण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून घेतलेला आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारचा समन्वय हवा होता. उजनी धरण सोडल तर सोलापूर जिल्ह्याला सिंचनसाठी पाणी नाही. अचानक 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळविणे आणि अर्थमंत्र्यांनी 600 कोटी रूपये मंजूर करणे हे सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे. भरणे मामा हे पालकमंत्री आहेत, तेव्हा त्यांनी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे नरड दाबण ही भूमिका गैर आहे, तेव्हा निर्णय मागे घ्यावा. मी शिवसेनेचा आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडे पूर्ण प्रयत्न करणार आहे. वेळ पडली तर रक्तरंजित लढाई लढू पण आम्ही पाणी जावू देणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी दिला आहे.
उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी योजनेस ठाकरे सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उजनीचे पाणी इंदापूरला नेण्यास उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत सुरू केली आहे. आज सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले.
पाणीचोर अजित पवार हाय हाय
पाणीचोर अजित पवार हाय हाय, पाणीचोर पालकमंत्र्याच करायचं काय खाली मुंडी वर पाय, महाविकास आघाडी सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आल्या.