सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन,पण.. – अशोक गेहलोत

जयपूर । काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारवर राजकीय संकट अजून कायम आहे. एकीकडे पायलट यांच्यावर अन्याय झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत प्रसारमाध्यांसमोर येऊन आपलं सरकार पडण्यामागे पायलट कसे सक्रिय होते याबाबत सांगत आहेत.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना मागच्या दीड वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद नाहीय” असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सांगितले.
“एक मंत्री त्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर बोलत नव्हता, तसेच कुठला सल्लाही घेत नव्हता. आमच्यात कुठलाही संवाद नव्हता. लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धीही परस्परांशी बोलतात. लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा आहे” असं सांगितलं. मात्र, सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन” असं म्हणत गेहलोत यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले कि, “आपल्याला टार्गेट केलं जातंय असं पायलट यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि विनाकारण SOG ने पाठवलेल्या नोटीसला त्यांना मुद्दा बनवला. १० ते १२ आमदारांना नोटीस बजावली होती” असे गेहलोत म्हणाले. “भाजपा आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करतेय, अशी तक्रार आमच्या पक्षाने SOG कडे केली. आम्ही कुठेही त्यांचे नाव घेतले नाही. पण तेच स्पष्टीकरण देत होते. ते का स्पष्टीकरण देत होते, ते आता समोर आलंय” असे गेहलोत यांनी सांगितलं.

पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्री बनवण्यात आले, मग राजस्थानमध्ये असे का घडले नाही? या प्रश्नावर मुख्यमंत्री गेहलोत यांनी ‘तो हायकमांडचा निर्णय होता’ असे उत्तर दिले. “बहुतांश आमदारांचा मला पाठिंबा होता आणि राजस्थानची स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत वेगळी होती. राजस्थानमध्ये लोकांना मला मुख्यमंत्री झालेले पाहायचे होते” असे गेहलोत यांनी सांगितले. “जेव्हा तुम्ही अतिमहत्वकांक्षी होता, तेव्हा तुमचे विचार मागे पडतात” अशी टिप्पणी करत गेहलोत यांनी पायलट यांची बंडखोरी अनैतिक असल्याचा इशारा केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”