मुंबई । सध्या देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ‘सीएनएन न्यूज १८’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनचा मुहूर्त निश्चित केला होता. देशात करोनाचं असताना केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. ‘राम मंदिर बांधल्यानं करोना जाईल असं काही लोकांना वाटत असेल,’ असा टोला त्यांनी हाणला होता. त्यावरून राज्यातील भाजप नेत्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. तसंच, पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यातील सत्तेत असलेल्या हिंदुत्ववादी शिवसेनेलाही लक्ष्य करण्यात आलं होतं.
शिवसेनेचे पक्षप्रमुख अयोध्येत भूमिपूजनला जाणार का की त्यांना शरद पवारांची ‘एनओसी’ घ्यावी लागणार, अशी टिप्पणीही करण्यात आली होती. त्यावर आम्हाला निमंत्रणाची गरज नाही. आम्ही अयोध्येला जाणारच असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आता निमंत्रितांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचं नाव असल्याचं स्पष्ट झाल्यानं त्यांच्या निर्णयाकडं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ‘सीएनएन न्यूज १८’ या वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा एकदा मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर सर्व वाद मिटले आहेत. मात्र, भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण देशात सध्या करोनाची गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थिती राज्यातच राहणं महत्त्वाचं आहे. राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे,’ असं ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”