जिल्ह्यात आयसीयू बेड दुपटीने वाढविणार ः जिल्हाधिकारी

औरंगाबाद | कोरोनाबाधित गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उपचाराच्या सुविधा कमी पडत आहेत. जिल्ह्यातील आयसीयू बेड वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा घेतला आहे. जिल्ह्यात २५७ व्हेंटिलेटर बेड असून ही संख्या दुप्पट करण्याचे नियोजन आहे.

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य सुविधांवर ताण वाढला आहे. जिल्ह्यातील आयसीयू बेडची संख्या कमी पडत आहे. ग्रामीण भागात संसर्गबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. मराठवाड्यातील गंभीर रुग्णांना उपचारासाठी औरंगाबाद शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. परिणामी, उपचाराच्या सुविधा कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुविधांचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यासह मराठवाड्यातील प्रमुख रुग्णालयांना व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. कोरोना हा श्वसनाशी निगडीत आजार आहे. कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आयसीयू बेड वाढवण्याची आ‌श्यकता आहे. तसेच या बेडला व्हेंटिलेटर आवश्यक असल्याने चव्हाण यांनी उपलब्ध व्हेंटिलेटरचा आढावा घेऊन उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

सध्या जिल्ह्यात २५७ व्हेंटिलेटर बेड आहेत. ही संख्या वाढविण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी समन्वय साधल्यानंतर बजाज कंपनीने २५ व्हेंटिलेटर आणि सीएमआयएने नवीन २५ व्हेंटिलेटर घाटी रुग्णालयाला दिले आहेत. फिलिक्स इंडिया कंपनीला ५० व्हेंटिलेटरचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या कंपनीने व्हेंटिलेटर देण्यासाठी संमती दिली असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकडे १५० व्हेंटिलेटरचा तातडीने पुरवठा करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. हा पुरवठा लवकर झाल्यास जिल्ह्यातील व्हेंटिलेटरची संख्या दुप्पट होणार आहे. त्यातून गंभीर रुग्णांवरील उपचार सहजतेने होऊ शकतील, असे डॉक्टरांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like