मुंबई । जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आज त्र्यंबकेश्वर येथील १० पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट घेऊन राज्यातील सर्व मंदिरं (temple) आणि धार्मिक स्थळं सुरू करण्याची मागणी केली. त्यावर राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवितानाच काही प्रश्नही यावेळी उपस्थित केले.
महाराष्ट्रातील मंदिरं हे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. म्हणजेच मार्च महिन्यापासून ही मंदिरं बंद आहेत. कोणतीही गर्दीही होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळूहळू अनलॉकच्या दिशेने आपण जातो आहोत. असं सगळं असताना मंदिरं उघडण्यास काय हरकत आहे? योग्य खबरदारी घेऊन जर मॉल्स उघडले जाऊ शकतात, दुकानं उघडली जाऊ शकतात तर मंदिरं का उघडण्यात येत नाहीत? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.
याशिवाय शासकीय नियमांचं पालन करूनच मंदिरं खुली व्हावीत, पण मंदिरं सुरू केल्यानंतर भाविकांची झुंबड उडाल्यास तुम्ही काय कराल? भाविकांची गर्दी कशी रोखाल? कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून गर्दीवर कसे नियंत्रण आणाल? असे काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. तसेच मंदिरं सुरू केल्यानंतर इतर धर्मिय नियम पाळतील काय?, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर त्र्यंबकेश्वर येथील पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही समाधान व्यक्त केलं आहे. उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनही मंदिरं बंद आहेत. म्हणून आमचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. आम्हाला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समाधान वाटतं आहे. राज ठाकरेंना भेटल्यानंतर मंदिरं उघडण्याच्या निर्णयाबाबत काहीतरी सकारात्मक घडेल असा आम्हाला विश्वास आहे असं पुजाऱ्यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”