मुंबई । देशभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा १३ वा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे. यासाठीच स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. त्यानुसार यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास आयपीएल स्पर्धेचे वर्षाअखेरीस आयोजन करणं सहज शक्य असल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
तर.. बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करणार
कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसीलाही याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मध्यंतरी प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा खेळवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. मात्र आयसीसीच्या बहुतांश सदस्यांचा याला विरोध असल्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलली जाईल असे संकेत मिळत आहेत. असं झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करु शकतं. याविषयीवर बीसीसीआय अधिकाऱ्यांची टेलिकॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. विश्वचषकातला एक-दुसरा सामना रिकाम्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो, मात्र संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवणं शक्य नसल्याचं मत एका बीसीसीआय अधिकाऱ्याने व्यक्त केलं. “जर या कालावधीत आयपीएल आयोजनाची संधी मिळाली तर आम्ही नक्की प्रयत्न करु, पण सध्या यावर आम्ही ठोस काहीही सांगू शकणार नाही.” “सध्या बीसीसीआय कोणत्याही गोष्टीबद्दल ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पण खेळाडू, प्रेक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल कोणताही धाडसी निर्णय घेण्यास आम्ही तयार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल काय निर्णय घेतात हे आधी पहावं लागेल, त्यानंतर आयपीएलच्या आयोजनाबद्दल विचार करता येईल. सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनाबद्दल निर्णय घेईल”, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एक्स्प्रेसला माहिती दिली.
टी-२० विश्वचषक स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्यास अनेक देशांचा नकार
टी-२० विश्वचषक स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्यास अनेक देशांचा नकार आहे, त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यास आयपीएल आयोजनाची संधी मिळेल. परदेशी खेळाडूंचा सहभाग हा त्यावेळी फारसा मोठा मुद्दा असेल असं वाटत नसल्याचं मत बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. परदेशी खेळाडूंना लिलावात मिळणाऱ्या रकमेतली १० टक्के रक्कम ही आपल्या बोर्डाला द्यावी लागते. सध्या करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता सर्व क्रिकेट बोर्ड बीसीसीायशी चांगलं नात ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत, बीसीसीआय अधिकाऱ्याने माहिती दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”