हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे आधीच राज्यातील राजकीय वातावरण बिघडलं असतानाच आता भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच राणेंनी ग्रामस्थांना दिली आहे.
१८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी नितेश राणे हे सिंधुदुर्ग येथील नांदगावमध्ये प्रचाराला आले होते. यावेळी राणे म्हणाले, जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल त्या गावाचाच विकास मी करणार अन्यथा विकास करणार नाही. मी अगदी स्पष्टपणे सांगतो. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही. याची पुरेपूर काळजी मी घेईन असं राणे म्हणाले.
निधी कोणाला द्यायचा त्याची सर्व सूत्रं माझ्या हातात आहेत. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री, कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा, असेही राणेंनी म्हंटल. त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.