सडानिनाई वनहद्दीत बेकायदा बांधकाम व खाणकाम : तीन वाहने जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तालुक्यातील सडानिनाई येथे वनहद्दीत बेकायदा बांधकाम व खाणकाम केल्याप्रकरणी वनविभागाने तेथील भरत घोंडीबा झोरे याच्यावर गुन्हा दाखल करत खाणकाम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही जांभा दगड चिरे खाणीचे काम सुरू ठेवल्याने २ मिनी ट्रक व ट्रॉलीसह १ ट्रॅक्टर ही तीनही वाहने जप्त करून भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाटणचे वन परिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. पोतदार यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी ढोरोशीचे वनपाल व धायटीचे वनरक्षक यांनी सडानिनाई येथील भागात भरत घोंडीबा झोरे रा. सडानिनाई यांच्या जांभा दगड चिरे खाणीची तपासणी केली असता खाणीचा बराच भाग हा वन विभागाच्या हद्दित असल्याचे दिसून आले. तसेच वन हद्दिच्या आत दगडी चिऱ्यांचे घर आढळून आले. त्यामुळे धायटीच्या वनरक्षकांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) डी, जी व कलम ६३ (अ) (ब) (क) अन्वये गुन्हा दाखल केला व सदर खाणीतील खोदकाम बंद करण्याच्या सुचना भरत झोरे यांना दिल्या.

तद्नंतर शुक्रवारी (दि. ११) रोजी सातारा येथील सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुरणे, पाटणचे वन परिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. पोतदार, वनपरिमंडळ अधिकारी ए. के. राऊत, धायटीचे वनरक्षक आर. ए. कदम व राऊंड स्टाफ यांच्यासह सडानिनाई येथे भरत झोरे यांच्या खाणीची तपासणी केली असता खाण बंद न करता तेथे २ मिनी ट्रक व १ ट्रॅक्टर व ट्रॉली सह जांभा दगड चिरे भरुन वाहतूक करण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले.

त्यामुळे ही तीनही वाहने जप्त करण्यात आली. याबाबत भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वन जमिनीवर अतिक्रमण करुन तात्पुरत्या स्वरुपात मजुरांसाठी बांधलेली निवारा खोली पाडून अतिक्रमण नष्ट करण्यात आले. खाणीतील खोदकाम साहित्य सील करुन खाणीचे काम बंद करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment