औरंगाबाद । देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात काहीसा शिथिल करण्यात आला आहे. अपवाद वगळता राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा वेळी दारूच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. वाइन शॉप सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली आहे.
‘दारू खरेदी करण्याएवढा पैसा ज्यांच्याकडं आहे ते अन्नधान्यही नक्कीच खरेदी करू शकतात. त्यामुळं वाइन शॉप सुरू होताच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा,’ अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडं केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्या चांगल्या कामाचं आम्ही देखील कौतुक करत होतो. पण आता ते सगळं व्यर्थ गेलं आहे. औरंगाबादमध्ये एकही दुकान आम्ही उघडू दिलं नाही. मग रेड झोनमधील इतर आमदार, खासदार या मृत्यूच्या खेळाला का आमंत्रण देत आहेत. कदाचित ते देखील ‘बेवडे’ असावेत,’ असा संताप जलील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा वाइन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. शेवटी आमची भूमिका योग्य ठरली आहे. मात्र, दोन दिवसात आरोग्याच्या दृष्टीनं नेमकं किती नुकसान झालं असेल माहीत नाही,’ अशी चिंताही जलील यांनी नव्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.
किंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”