लढा कोरोनाशी | इंद्रजीत यादव
कोरोनाचा विळखा आता जवळपास संपूर्ण जगाला बसल्यानंतर आत्मचिंतन करण्याची वेळ माणसावर आली. तांत्रिक प्रगती सर्वच समस्यांची उत्तरे जशी सध्या तरी देऊ शकत नाही त्याचप्रमाणे काही नव्या समस्यादेखील निर्माण करत असते हे आजतागायत आपण पुस्तकात खूप वाचले होते. आज ते प्रत्यक्ष अनुभवत आहोत. या सर्व औद्योगिक प्रक्रियांत एक गोष्ट विकसित राष्ट्र स्वीकारत नाहीत आणि विकसनशील राष्ट्र साळसूदपणे कानाडोळा करतात. ती म्हणजे हवामान बदल आणि त्याचे जगावर होणारे परिणाम…
मागील लेखात आपण कोरोनाचा पर्यावरणावर झालेला सकारात्मक परिणाम पहिला. मात्र पर्यावरणाची विकास प्रक्रिया आणि माणसाच्या हव्यासातून होणारी हानी थांबवायची असेल तर आज पूर्णपणे ठप्प झालेल्या जगास आत्मचिंतन करून या सर्व प्रक्रिया पर्यावरणपूरक करण्याची ही एक संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. पर्यावरणीय प्रदूषण आणि हवामान बदल या गोष्टी बहुचर्चित असूनदेखील त्याचा गाभा हा नेहमी दुर्लक्षित राहिलेला आहे. २०१८, २०१९ मध्ये २ अहवाल प्रकाशित झाले. ज्यावर खरेतर पर्यावरणासाठी स्थपन केलेल्या जगातील सर्व फोरम्सवर चर्चा होणे अपेक्षित होते आणि विशेषतः माद्रिद येथे पार पडलेल्या हवामान बदल उपाययोजनांवरील CoP – 25 मध्ये पण तसे घडले नाही. या अहवालाचा सखोल अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की, कोरोनापेक्षा भयावह व जीवघेणी आपत्ती वातावरणात शिरकाव करून हळू हळू आपली पाळेमुळे विध्वंसाच्या दिशेने घट्ट करत आहे. जाणते असतानाही आपल्या अजाणतेपणी…त्यामुळे कोरोननंतरच्या जागाच विचार करत असताना What Next is ???…तर पर्यावरण…पर्यावरण…आणि पर्यावरण…
१.५ अंश सेल्सिअसची जागतिक तापमान वाढ – हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनल अर्थात IPCC द्वारे ६ ऑक्टोबर २०१८ रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. पॅरिस करारातील पूर्वनियोजित तापमानवाढीचे लक्ष्य मग ते १.५ अंश से. असो अथवा जास्तीत जास्त २ अंश से असो हे गाठणे आजच्या घडीला तरी अशक्यप्राय गोष्ट वाटत आहे. International Centre for Integrated Mountain Development (ICIMD) या संस्थेद्वारे २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या हिंदुकुश हिमालय मूल्यांकन अहवाल २०१९ मध्ये देखील काही स्तिमित करणाऱ्या तथ्यात्मक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे साहजिकच जागतिक तापमानवाढ व हवामान बदलाचे मानवी जीवनावर होणारे अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन परिणाम ही नव्या येऊ घातलेल्या विध्वंसाचीच नांदी असतील. पर्यावरणाच्या चिंतेवर चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे. नाहीतर या चिंतेचे बघता बघता कधी चितेत रूपांतर होईल हे आपल्याला कळणारदेखील नाही.
आर्क्टिक महासागर बर्फहीन व सागराच्या पाणीपातळीत वाढ –
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानवाढीमुळे दशकातून एकदा आर्क्टिक महासागर बर्फहीन होनाची शक्यता IPCC ने वर्तविली आहे. बर्फ वितळल्याने साहजिकच समुद्रातील पाण्याच्या आकारमानात वाढ होईल. मात्र या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की, सध्या जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होत आहे पण ही वाढ अशा प्रकारे बर्फ वितळल्याने अधिक तीव्र गतीने होईल ज्याचा परिणाम बेटस्थित राष्ट्रांवर होईल किंबहुना होताना दिसत आहे. उदा. इंडोनेशियाने समुद्राच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता आपली राजधानी नुकतीच जकार्तावरून कालीमंतन येथे हलवली आहे. यामुळे किनारी भागातील भूजल धोक्यात येणे/ होणे, पाणथळ प्रदेश धोक्यात येणे, किनारी भागातील सजीवांचा अधिवास नष्ट होणे, किनारी भागातील शहरे जलमय होणे इत्यादी धोके संभावित आहेत.
प्रवाळ भित्तीकांचा ह्रास – जगातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवाळ भित्तीका आढळतात. भारतात अंदमान निकोबार, लक्षद्वीप बेटे, मन्नारचे आखात, कच्छचे आखात या प्रदेशात सुमारे १९००० चौ. किमी क्षेत्रात प्रवाळ आढळतात. प्रवाळ आढळणाऱ्या जगातील ०. १% प्रदेशावर सागरी जैवविविधतेपैकी २५% जैवविविधता आढळते. जगातील सर्वात मोठे प्रवाळ असणाऱ्या ग्रेट बॅरियर रिफ येथे १५०० पेक्षा जास्त माशांच्या प्रजाती आढळतात. यावरून आपल्याला अंदाज येईल की प्रवाळ भित्तीकांचा ह्रास हा परिसंस्थांमध्ये समतोल राखण्याच्या दृष्टीने किती घातक ठरू शकतो.
निव्वळ शून्य उत्सर्जन (Net Zero Emission) – जगातिक तापमानवाढ व हवामान बदल यासाठी केले जाणारे प्रयत्न योग्य दिशेने आणि गरजेनुरुप वेगाने केले नाहीत तर शून्य टक्के उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे २०७५ पर्यंत तरी शक्य होईल का यावर साशंकता आहे. याचा परिणाम मानवी जीवनाच्या प्रत्येक आयमावर होईल .
हिंदुकुश हिमालय आणि पर्यावरणीय समस्या – ICIMD ने प्रकाशित केलेल्या हिंदुकुश हिमालय मूल्यांकन अहवालाचे विश्लेषण केल्यास २१०० सालापर्यंतचे विदारक वास्तव समोर येते. २१०० सालापर्यंत हिंदुकुश हिमालयातील दोन तृतीयांश हिमनद्या वितळतील असे अनुमानित आहे. गंगा,ब्रह्मपुत्रा, मेकाँग इत्यादी १० नद्यांचे हिंदुकुश हिमालय हे उगमस्थान आहे. २४० दशलक्ष लोक जीवन व उपजीविकेसाठी हिंदुकुश हिमालय परिसरावर अवलंबून आहेत. तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५% लोकसंख्येस संसाधने व परिस्थितिकीय सेवा यांच्या माध्यमातून या परिसराचा लाभ होतो. थोडक्यात काय तर हिंदुकुश हिमालयातील हिमनद्या वितळणे व तिबेटच्या पठाराचे तापमान वाढणे याचा सर्वप्रथम परिणाम व्यापारी वाऱ्यांच्या अभिसरणावर होऊ शकतो. कारण या तापमानातील फरकावर देखील हे अभिसरण अवलंबून असते. थोडक्यात काय तर हवामान, ऋतुमान, परिसंस्था, आरोग्य व पोषण, वनस्पती व प्राणी प्रजातींचे अस्तित्व अशा जीवावरणातील सर्व आयामांवर परिणाम संभाव्य आहे. आणि त्याच्या अनेक खुणा अलीकडे घडलेल्या काही घटनांतून स्पष्ट होतात. उदा अमेझॉन वणवे, ऑस्टेलियन बुश फायर इत्यादी. याचा अर्थव्यवस्थेवर पण निश्चितच मूलगामी दूरगामी परिणाम दिसून येईल.
त्यामुळे कोरोनानंतरच्या जगाचा विचार करताना येथे There is enough on Earth for everybody’s need but not for everybody’s greed…या महात्मा गांधीजींच्या उक्तीप्रमाणे संसाधनाचा पर्याप्त व न्याय्य वापर, शाश्वत विकास व त्यायोगे पर्यावरण पूरक विकासावर लक्ष केंद्रित करणे ही कोरोनानंतरच्या जगातील काळाची गरज असेल. अन्यथा आज व्हेंटिलेटर विना दगावणारी माणसे त्या वेळेस ऑक्सिजनविना दगावतील..
लेखक परिचय – इंद्रजीत यादव हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी, पर्यावरण आणि पारिस्थितिकी या विषयावर मार्गदर्शन करतात. सध्या ते द युनिक अकॅडमीमध्ये काम पाहतात. त्यांचा संपर्क – 9158854953