हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. मात्र आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले नाहीत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवार नाराज झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या सर्व चर्चांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, अजित पवारांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना आजच्या बैठकीमध्ये सहभागी होता आले नाही. मात्र त्यांच्या गैरहजेरीवर वेगळे अर्थ काढू नयेत.
मंत्रिमंडळात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने सहा प्रमुख महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यातील महत्त्वाचा निर्णय हा दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार असल्याचा निश्चय देखील सरकारने आजच्या बैठकीत केला आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे –
✅दिवाळीनिमित्त… pic.twitter.com/snCAx2DF0C
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 3, 2023
इतकेच नव्हे तर, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ घेता येणार आहे. याबरोबर, नागपूरमध्ये पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भातील ४५ पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
यानंतर, राज्यातील सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आला आहे. तसेच, गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विनाअनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान देणार असल्याची घोषणा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. अशा पद्धतीने आजच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
नांदेड घटनेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, “नांदेड रुग्णालयात औषधांचा जास्तीचा साठा होता, औषधांची कमी नव्हती. चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा घटनास्थळी जाऊन आढावा घेतला जाईल. तसेच नांदेडमध्ये घडलेली घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे.”