सातारा प्रतिनिधी | हिमालयाच्या पर्वतरांगेत व लेह – लडाखमध्ये मूळ वास्तव्याला असलेला थिरथिरा अर्थात कंपनपक्षी हिवाळी पाहुणे म्हणून येथील सयाजीराजे पार्कमध्ये येऊन दाखल झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली. कंपनपक्ष्याबद्दल डॉ. कुंभार यांनी सांगितलेली माहिती अशी की, कस्तूरिका कुलातील या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात विणीवर जाणारे हे पक्षी हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टी पासून बचाव करून घेण्यासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये भारतीय उपखंडातील महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात स्थलांतर करून येतात.
हे पक्षी दरवर्षी ठरलेल्या ठिकाणीच येऊन राहतात. जोडीने आलेले हे चिमुकले पक्षी उन्हाळा संपेपर्यंत एकाच ठिकाणी राहून पावसाळ्याच्या प्रारंभी मूळ ठिकाणी परत जातात. या पक्ष्यांतील वैशिष्ट्य म्हणजे नर व मादी दोन्ही मधील शेपटी एखाद्या मद्यपी किंवा क्रोधीत व्यक्तीचे हात जसे थरथरतात तसे थरथरते. याच कारणावरून या पक्ष्याला कंपनपक्षी असे नाव पडले आहे. या पक्षातील नर-मादीतील फरक सहज ओळखता येतो. नर पक्षी रुबाबदार असून त्याचे डोके पाठ व पंख कुळकुळीत काळ्या रंगाचे असतात. छातीला केशरी रंगाची छटा असते. मादी पूर्णपणे फिकट रंगाची असून तिच्या डोळ्याभोवती पिवळसर वलय असते. हे पक्षी अतिशय चपळ असून कीटक व कोळी टिपण्यासाठी सतत एका जागेवरून दुसर्या जागेवर उडत राहतात.
स्थानिक पक्षी अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कंपनपक्ष्यांची जोडी सकाळ व संध्याकाळच्या वेळी पार्क मधील विस्तृत हिरवळ व बोटिंगच्या पायरीजवळ भक्ष्य मटकावत वावरतानाचे दृश्य मनोहारी वाटते. पार्कमध्ये वाढविलेल्या सुशोभित वृक्षराजीत चिमणीवर्गीय अनेक स्थानिक तथा स्थलांतरित पक्षी आकर्षित होतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.