हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून लॉकडाऊनची तयारी सुरू आहे. याच निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून आढावा घेत आहे. आजही आढावा बैठकांचे सत्र सुरू आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून चर्चा केली.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज यांना आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष म्हणून संवाद साधण्यासाठी मनसेची निवड केली. राज ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे.
. @abpmajhatv @zee24taasnews @News18lokmat @saamTVnews @TV9Marathi @mataonline @MiLOKMAT @LoksattaLive https://t.co/EQiaR4JD43
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2021
दरम्यान, कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज रविवार 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनचा निर्णय यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध वर्गातील लोकांसोबत चर्चा करून लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची तयारी करत असल्याचं दिसत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याने कठोर निर्बंध लावण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येऊ शकतो.