चिपळूण | येथील शहरातील वाणीआळी येथे राहणार्या महिला ग्रामसेविकेने आत्महत्या केली आहे. स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. यामध्ये ग्रामसेविका 80 टक्के भाजल्याने उपचारासाठी तिला मुंबईत हलविण्यात आले होते. मात्र, तिचा यामध्ये मृत्यू झाला. वासंती संजय पाटील (30, मूळ रा. नंदूरबार) असे या मृत ग्रामसेविकेचे नाव आहे. या घटनेने तालुक्यातील ग्रामसेवकांमध्ये शोक व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील तळसर येथे वासंती पाटील ग्रामसेविका म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी (दि.20) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या खोलीत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगावरील कपडे पेटल्यानंतर त्या दुसर्या मजल्यावरून धावत खोलीच्या बाहेर येत पहिल्या मजल्यावर आल्या. या वेळी इमारतीमधील रहिवासी घाबरले.
मात्र, काहींनी तत्काळ त्यांच्या अंगावर पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्या 80 टक्के भाजल्या होत्या. तातडीने त्यांना लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारार्थ त्यांना ऐरोली नवी मुंबई येथे हलविण्यात आले. घटनास्थळी ग्रामसेवक संघटनेच्या काही पदाधिकार्यांनी धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिस फौजदार प्रकाश शिंदे यांनी या घटनेचा पंचनामा केला.