खटावमध्ये लाळ खुरकत रोगाने 50 मेंढ्यांचा झाला मृत्यू

सांगली | मिरज तालुक्यातल्या बेडग येथील लाळ खुरकत रोगाने 40 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता खटाव येथे गेल्या आठ दिवसांत जवळपास 50 हुन अधिक मेंढी व त्यांच्या पिलांचे मृत्यू झाल्याने मेंढी पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील आठ दिवसांत खटाव परिसरातील पन्नासहून अधिक मेंढी व मेंढीचे पिले यांचा मृत्यू झाला असून बेडग परिसरातील लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसीकरण करणे आवश्यक होते परंतु मागील कित्येक महिन्यांपासून तेथील जनावरांना पशुवैद्यकीय विभागाकडून दुर्लक्ष असून कोणत्याही प्रकारचे लसीकरण केलेले नाही. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण तातडीने करण्याची मागणी आता होत आहे.

बेडग, आरग परिसरात लाळ खुरकत रोगाने अजूनही मृत्यू होतच आहेत, लसीकरण अजून पूर्ण झालेले नाही बेडग मध्ये लसीकरण न केल्याने कालच पुन्हा दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता खटाव परिसरात मेंढ्यांच्या मृत्यूने पशु पालकातून भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दूषित पाणी पिल्याने जनावरांचा मृत्यू झाला असून यावर उपाययोजना सुरू असल्याचे लिंगनूरचे पशु पर्यवेक्षक शेखंडे यांनी सांगितले. पशुवैद्यकीय विभागाकडून वेळीच लसीकरण केले असते तर मृत्यू झाले नसते. आता तरी तत्काळ योग्य लसीकरण करणे आवश्यक असून याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.

You might also like