औरंगाबाद | मुलीला चांगलं वागवत नाही म्हणून मुलीकडच्या मंडळींनी जावयाला सासरी बोलावून हात-पाय बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना चार जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी गावात घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपली बदनामी झाली म्हणून जावयाने आपल्या मावस बहिणीच्या गावी म्हणजेच उंडणगाव ता. सिल्लोड येथे जाऊन शुक्रवारी 16 जुलै रोजी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
शिवाजी रघुनाथ चव्हाण, वय 22 (रा. कबाल वाडी ता. जुन्नर जिल्हा पुणे) असे जावयाचे नाव आहे. शिवाजीला सासरच्या मंडळांनी घरी बोलावले. आणि तुम्ही आमच्या मुलीला चांगलं वागवत नाही, म्हणून अमानुषपणे मारहाण केली. याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ सगळेजण पाहतील आणि आता माझी बदनामी होईल. या भीतीने शिवाजीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर नातेवाईकांनी शिवाजीला सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले.
हाती आलेल्या माहितीनुसार, शिवाजी चव्हाण यांच्या आईच्या फिर्यादीवरून या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. माझ्या भावाला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती अशी तक्रार चव्हाण यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी 7 जुलै रोजी सासरकडील अकरा जणांवर गुन्हा दाखल केला यामध्ये जिजाबाई पवार(सासू) रामराव पवार (सासरा) विजय पवार (मेहुना) रवी पवार, राजू पवार, विकास पवार, (चुलत मेव्हणे) देवानंद मोहिते, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेखाबाई, काळुबाई पवार, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.