कराड | मलकापूर शहरातील आगाशिवनगर येथील दांगट वस्तीत चौकात येण्या-जाण्याच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 36 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शशिकांत खाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती व नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. असे असतानाही दांगट वस्ती आगाशिवनगर येथे भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत भांडण करणाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
मात्र तरीही दोन्ही बाजूकडील जमाव शांत राहत नव्हता. दोन्ही बाजूकडून भांडण करणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. ते एकमेकांना लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण करत होते. पोलिसांनी सांगूनही मारामारी करणारे ऐकत नसल्याने नाईलाजास्तव पोलिसांनी आणखी फौजफाटा मागवला. तसेच संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस व्हॅनही बोलावून घेतली. पोलीस व्हॅन दिसताच भांडण करणारे सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन दोन्ही बाजूच्या छत्तीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे करत आहेत.