हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गणेश उत्सव सण संपूर्ण महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरी होत आहे. आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे आवाहन देखील असणार आहे. असे म्हणले जाते की, आज गौरीच्या रूपात साक्षात पार्वती माहेरपणाला आपल्या घरी येते. ती घरी आल्यानंतर तिच्यासाठी सर्व गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जातो. तसेच तिच्यासाठी संपूर्ण घर शोभेच्या वस्तूंनी, रांगोळी काढून सजवले जाते. गौरींचे आगमन फक्त दोन दिवसाचे असले तरी या दिवसात तिच्यासाठी सर्व काही गोष्टी केल्या जातात. महाराष्ट्रातील काही ठिकाणी तर गौरी पूजनाच्या दिवशी मटण, कोंबडीवडे असा नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे. परंतु या मागचा नेमकं कारण काय हे तुम्हाला माहित आहे का?
पौराणिक कथा
महाराष्ट्रातील कोकणातील भागांमध्ये गौराईंच्या पहिल्याच दिवशी तांदळाच्या भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच भाज्यांचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी दाखविला येतो. तर त्यानंतर गौरीसाठी तिखटाचा , मासांहारी नैवेद्य दाखवला जातो. ही परंपरा एका पौराणिक कथेवर आधारित आहे. ती कथा अशी आहे की, ज्यावेळी माता पार्वती गौरीच्या रूपात माहेरपणाला येते, तेव्हा तिचे खूप लाड केले जातात. परंतु भूतगणांना मांसाहार न मिळाल्यामुळे तिची निराशा होते. यावेळी ती स्वतः मांसाहार बनवण्यास सांगते आणि आपल्या भूतगणांना देते. यानंतर ती अन्न ग्रहण करते.
माता पार्वतीसोबत आलेले भूतगण म्हणजेच जीचे रक्षक असतात. या भूतगणांचा मान म्हणूनच मांसाहाराचा बेत केला जातो. हा नैवेद्य जरी गौराईन पुढे ठेवण्यात आला असला तरी तो तिच्या रक्षकांसाठी ठेवण्यात आलेला असतो. अनेकवेळा ज्यावेळी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तेव्हा गौराई आणि नैवेद्याच्यामध्ये एक पडदा देखील लावण्यात येतो. तसेच गणपती व गौराईच्यामध्ये देखील पडदा लावला जातो. अशा या पौराणिक कथेमुळेच कोकण भागामध्ये गौराईंना मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु ही प्रथा सर्वच ठिकाणी पाळली जात नाही. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी गौरी गणपतींना हा सात्विक असा नैवद्य दाखविला जातो. गौरी घरी आल्यानंतर त्यांचे लाड केले जातात. त्यांच्यासाठी अनेक खास पदार्थ बनवले जातात. यानंतर गौराईंची पाठवणी केली जाते.