मुंबई । मिशन बिगिन अगेन अंतर्गत ५ ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकानं ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाउनच्या काळात मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारीच ही बातमी ठरली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहे. परिणामी ५ ऑगस्टपासून शहरातीस सर्व दुकानं आठवडाभर म्हणजेच सातही दिवस सुरु राहणार आहे.
याशिवाय दारूची दुकानं सुद्धा ९ ते संध्याकाळी ७ सुरु राहणार आहेत. या वेळेत मुंबईत काऊंटरवर दारू विक्रीही सुरु होणार आहे. सम- विषमचे सर्व नियम रद्द करण्यात आले असून, आता अनलॉकच्या प्रक्रियेचा हा नवा टप्पा शहरात सुरु होणार आहे. एवढंच नाही तर मद्य हे घरपोचही देता येणार आहे. केंद्राने दिलेल्या आदेशांनुसार आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केला तर कारवाई केली जाणार आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मॉलमधली थिएटर्स बंद राहणार, फूड कोर्ट, रेस्तराँ, हॉटेल्स या सगळ्यांना होम डिलिव्हरीची संमती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग हा मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे. शिवाय रुग्णसंख्या वाढीचा कालावधीही वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढण्याच्या वेगात लक्षणीय घट आल्यामुळं हे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नाना आलेलं यश असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यात लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या. या अंतर्गत काही सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”