हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी लढत होत आहे. यात पालघरमध्ये शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित गावित उमेदवार म्हणून उभे होते. त्यांचा भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी पराभव केला आहे. तर मनसेने पंचायत समिती गणातून या ठिकाणी विजयाचे खाते उघडले आहे. पालघर पंचायत समितीत मनसेच्या तृप्ती पाटील या विजयी झाल्या आहेत.
डहाणू तालुक्यातील वणई गटात शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते. मात्र, या ठिकाणी रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र त्यांना भाजपने पराभूत केले आहे.
राज्यातील सहा जिल्हा परिषदांतील 84 जागा आणि त्या अंतर्गत 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. राज्यातील मिनी मंत्रालयात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्या उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत.