हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल आणि डिझेल ही जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. आपल्याला कोठेही प्रवास करायचा असेल तर गाडीत पेट्रोल टाकून आपण जाऊ शकतो. सध्या पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला सुद्धा भिडले आहेत. परंतु भारतात अशी काही ठिकाणी आहेत जेथे वेळेवर पेट्रोल सुद्धा मिळू शकत नाही. त्यातच मिझोराम येथील सरचिप जिल्ह्यात तर पेट्रोल घेण्यासाठी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. हो, कमी पेट्रोल पुरवठा असल्याने याठिकाणी कधी कधी इमर्जन्सी परिस्थितीत पेट्रोल मिळू शकते पण त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आवश्यक बनली आहे. याबाबत महात्मा गांधी राष्ट्रीय फेलो विकास वाळके यांनी आपल्या you tube चॅनेल वर थेट भाष्य करत भारताची दुसरी बाजू मांडली आहे.
खरं तर मिझोराम हा पहाडी भाग असून याठिकाणी आसाम वरून पेट्रोल येते. त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे कधी कधी पेट्रोलचा पुरवठा अचानक संपतो. अशा वेळी इमर्जन्सी परिस्थितीत पेट्रोल मिळू शकते पण त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. जर पेट्रोल नाही मिळालं तर तुम्हाला ब्लॅकने खरेदी करावं लागेल ज्याची किंमत १५०- १६० रुपये प्रतिलिटर असू शकते. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा म्हणजे जवळपास २ महिन्यांपूर्वी सुमारे १५ दिवस याठिकाणी पेट्रोल मिळाले नव्हते अशी माहिती विकास वाळके यांनी दिली आहे. सातत्याने पेट्रोल डिझेलचा साठा संपत असल्याने ब्लॅकने पेट्रोल डिझेलची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना पैसे कमावण्याची आयती संधी मिळत असून नागरिकांची मात्र लूटमार होत आहे.
मिझोराम येथील नागरिकांना नेहमीच अशा प्रकारच्या सामान्य संकटाना तोंड द्यावे लागते. ईशान्य भारतातील लोकांना या गोष्टीची सवय सुद्धा झाली आहे. एकीकडे आपण विकासाच्या गोष्टी करतो, अर्थव्यवस्था सुधारणेच्या गोष्टींच्या बाता मारतो. पण आपल्याच देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथे साधं पेट्रोल सुद्धा लोकांना वेळेवर मिळू शकत नाही हि नक्कीच खेददायक गोष्ट म्हणावी लागेल.