औरंगाबाद – पेट्रोल पंपावरील कर्मचारी खराब झालेल्या विद्युत मोटारीच्या पाहणीसाठी गेल्यावर संधी साधत दोन विधीसंघर्ष बालकांनी काउंटर मधील 1 लाख 33 हजार 580 रूपये चोरल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास आझाद चौकातील एस्सार पेट्रोल पंपावर घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून सीसीटीव्हीच्या मदतीने दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी 43 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, दोन्ही बालकांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
शहरातील सिडको परिसरातील आजाद चौकात एस आर कंपनी चा पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपावर मुदस्सीर खान शकील खान (24) हे व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. शनिवारी सायंकाळी पेट्रोल पंपावर नियमितपणे कामकाज सुरू असताना, एका पेट्रोल पंपावरील विद्युत मोटार खराब झाल्याची तक्रार पेट्रोल पंपावरील कर्मचारी शेख सलीम शेख शमशुद्दीन यांनी व्यवस्थापकांकडे केली. त्यावेळी मुदस्सर खान हे खराब झालेली विद्युत मोटार पाहण्यासाठी गेले होते. ही संधी साधत विधी संघर्ष बालकांनी पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये ठेवलेले 1 लाख 33 हजार 580 रुपये चोरून घेत पोबारा केला.
या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई जिन्सी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, सहाय्यक फौजदार संपत राठोड, अंमलदार नंदूसिंग परदेशी, सुनील जाधव, नंदलाल चव्हाण, संतोष बमनाथ आदींनी केली.