हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील(Pune) अत्यंत गजबजलेल्या स्वारगेट एसटी स्थानकात (Swarget ST Stand) 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. . या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा देत असतानाच आरोपीने पीडित तरुणीवरच आरोप केले आहेत. आता या घटनेसंबंधित एकेक धोकादायक बाबी समोर येत चालल्या आहेत.
नेमके काय घडले होते?
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे याने तरुणीला आपली ओळख एसटी कंडक्टर म्हणून दिली आणि तिला शिवशाही बसमध्ये नेले. त्यानंतर बसचे दोन्ही दरवाजे बंद करत तिला पळून जाण्याचा कोणताही मार्गच ठेवला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, पीडितेने आरडाओरडा केला, मात्र बसच्या काचा बंद असल्याने बाहेर कोणीही आवाज ऐकू शकले नाही. पुढे, आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करताना तिचा गळा दाबला, त्यामुळे ती अधिकच घाबरली. आपला जीव वाचावा म्हणून तिने त्याच्याकडे याचना केली. याचा फायदा घेत गाडे याने तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, पीडितेच्या भीतीचा फायदा घेत त्याने दुसऱ्यांदा तिच्यावर बलात्कार केला.
महत्वाचे म्हणजे पोलीस चौकशीत उघड झाले आहे की, दत्तात्रय गाडे हा पूर्वीपासूनच महिलांना लक्ष्य करीत होता. याआधीही त्याने एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता, परंतु भीतीपोटी त्या महिलेने मोठी तक्रार दाखल केली नव्हती आणि केवळ चोरीचा गुन्हा दाखल केला होता. शिवाय, तो रात्रीच्या वेळेस शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्थानक परिसरात सावज शोधत फिरत असायचा. याआधी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयावरून स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र, त्यावेळी पुरेसे पुरावे नसल्याने त्याला सोडण्यात आले.
दरम्यान, दत्तात्रय गाडे याच्या कुटुंबीयांनी त्याला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जे काही झाले ते दोघांच्या सहमतीने झाले असे आपल्याजबाबत दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने देखील म्हटले आहे. परंतु पोलिस तपासातून समोर आलेली माहिती आणि पीडितेच्या जबाब हा महत्त्वाचा मानला जात आहे. या घटनेनंतर पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.