जालना: ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी प्रा. प्रदीप सोळंके यांनी केली आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीची स्थापना देखील करण्यात आली असल्याची घोषणा यावेळी सोळंके यांनी दिली. तसेच यावेळी मराठा ओबीसी असल्याचे देखील अनेक पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.
संघर्ष समितीच्या वतीने मराठवाड्यातील मराठा समाजबांधवांच्या आरक्षणासाठी लढा दिला जाईल. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करावा, या साठी सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेली ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी सोळंके यांनी केली आहे. याच सोबत समितीच्या रूपरेषा ठरवण्यासाठी मराठवाड्याचा दौरा सुरु असून त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
मराठवाड्यातील मराठा ओबीसी असल्याचे अनेक पुरावे असल्याचे सोळंके म्हणाले. हैद्राबाद संस्थानात असलेल्या कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील मराठा समाजास ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला. या संदर्भातील सर्व पुरावे गोळा करण्यात येणार असून त्याद्वारेच मराठा आरक्षणासाठी संघर्ष करण्यात येणार असल्याचे सोळंके म्हणाले.