घाटीच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला; मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी करावी लागते प्रतीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सद्यस्थितीत घाटीत दररोज २० ते २५ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत आणि त्यामुळे व्यवस्थेवरील ताण वाढल्याने मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे दीड हजार नवे बाधित आढळून येत आहेत आणि सुमारे २० ते २५ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान एकट्या घाटीत मृत्यू होत आहे. त्यामुळे घाटीच्या व्यवस्थेवर दुपटीने-तिपटीने ताण वाढला आहे.

कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर शासकीय नियमावली काटेकोरपणे पाळावी लागते. यामध्ये डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिल्याशिवाय संबंधित कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह शवागारात नेता येत नाही. या प्रमाणपत्रासाठी रुग्णाची सर्व इत्यंभूत माहिती, वैद्यकीय माहिती, नातेवाईकांची सही अनिवार्य असते आणि या सगळ्या प्रक्रियेला तासभर वेळ कसाही लागतो. कधी-कधी सहीअभावी किंवा अन्य औपचारिकता पूर्ण न झाल्यास त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यानंतर मृतदेह शवागारात नेण्यासाठी घाटीने रुग्णवाहिकेची सोय केली असली तरी मृत्यू जास्त असतील तर रुग्णवाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनाच इच्छित स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी परवानगी आणावी लागते आणि त्यासाठीही पुन्हा काही तासांचा वेळ जाण्याची शक्यता असते. अंत्यसंस्कारासाठी परवानगी मिळाल्यानंतर कोवीड रुग्णांच्या अंत्यसंस्कारांसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेला कळवण्यात येते आणि त्या संस्थेकडून आधीच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर पुढच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नंबर लागतो. यातही प्रतीक्षा कालावधी वाढत जातो.

कोवीड रुग्णाच्या अंत्यसंस्कारावेळी मोजकेच नातेवाईक सोबत जाण्यास परवानगी दिली जाते. मात्र अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत आणि अंत्यस्कारावेळी वापरलेले पीपीई किट ताब्यात घेतल्यानंतरच वाहन मोकळे होते. यामध्ये काही तासांचा कालावधी लागतो आणि पुढच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागते. या एकूणच स्थितीमुळे नातेवाईकांना आपल्या आप्तस्वकीयांवरील अंत्यसंस्कारांसाठी कितीतरी तास प्रतीक्षा करावी लागत आहे आणि त्यामुळे नातेवाईकांची तगमग वाढली आहे.

Leave a Comment