मुंबई प्रतिनिधी | हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सुटणार हा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रेलचेल असल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचे मामा अप्पासाहेब जगदाळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादीमधील एका स्थानिक गटाने निर्धार मेळावा घेऊन मागणी केली आहे.
सराटी गावचे रहिवासी असणारे अप्पासाहेब जगदाळे हे सध्या इंदापूर कृषी उत्पन्न समितीवर सभापती म्हणून काम पाहत आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे अप्पासाहेब जगदाळे हे मामा जरी असले तरी त्या मामा भाच्यांमध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून मतभेद आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात त्यांना राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते.
इंदापूरच्या राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. तर येथील राष्ट्रवादी पक्षांतर्गत जातीय मुष्टियुद्ध रंगात आल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. इंदापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे धनगर समाजाचे आहेत. तर त्यांच्या विरोधात एकवटलेला राष्ट्रवादीतील गट हा मराठा बहुल आहे. त्यामुळे दोन्ही गटात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी अप्पासाहेब जगदाळे यांना एवढी वेळ मला लढू द्या पुढच्यावेळी राष्ट्रवादीचे तिकीट मी तुम्हालाच द्यायला लावतो असा शब्द दिला होता. मात्र त्या शब्दापासून भरणे यांनी आता तोंड फिरवले आहे. त्यामुळे अप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादी मधील एका गटाने केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीमधील या गटबाजीचा हर्षवर्धन पाटील यांना फायदाच होणार असल्याचे राजकीय जाणकार म्हणतात. तिकिटापासून वंचित राहणार गट राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करू शकतो एवढे टोकाचे मतभेद या दोन्ही गटात आहे अशी देखील इंदापूर मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमका इंदापूरचा आमदार कोण होते या प्रश्नाचे उत्तर निकालानंतरच समजणार आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link| http://bit.ly/308MQF6