कोल्हापूर | पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित गोकुळ दूध संघामध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाहू शेतकरी आघाडीने 21 पैकी 17 जागा मिळविल्या आहेत. तर सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागले आहे. आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता आजच्या निकालामुळे संपुष्टात आली आहे.
शाहू शेतकरी आघाडीतून डॉ. सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडकर, अरुनकुमार डोंगळे, अभिजित तायशेटे, विश्वास नारायण पाटील, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगुले, नविद मुश्रीफ, रणजित पाटील, नंदकुमार डेंगे, बाबासाहेब चौगुले, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, एस. आर. पाटील हे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. तर सत्ताधारी महाडिक गटातून शौमिका महाडिक, अमरीश घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके हे विजयी उमेदवार झाले आहेत.
या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत समोरासमोर जोरदार लढत पहायला मिळाली. निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठपासून रमणमळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरू झाली होती. क्रॉस वोटींगमुळे मतमोजणीस वेळ लागला आहे.