वृत्तसंस्था । सोमवारी रात्री लडाखमधील गलवाल येथे चीनी सैन्याने हल्ला केल्यानंतर १० भारतीय जवान चीनच्या ताब्यात होते. मात्र, चर्चेनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेनंतर या सैनिकांना गुरुवारी सोडून देण्यात आले. या १० जवानांमध्ये ४ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. मात्र, या सुटकेबाबत भारतीय लष्कराकडून अधिकृतणे अजून काहीही सांगण्यात आलेले नाही.
लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर या हिंसाचारात चीनच्या ४५ सैनिकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या हिंसक कारवाईत कोणीही भारतीय जवान बेपत्ता नाही असे लष्कराने एका निवेदनाद्वारे माहिती देताना म्हटले होते. दरम्यान, गेल्या ३ दिवसांपासून भारत आणि चीनच्या वरिष्ठ अधिऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठका झाल्या. या बैठकांमध्ये चीनने ताब्यात घेतलेल्या १० भारतीय जवानांच्या सुटकेबाबतच विशेष जोर देण्यात आला होता. याचाच अर्थ चीनने भारताचे १० जवान आपल्या ताब्यात ठेवल्याची माहिती भारताला हाती आली होती आणि भारत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील होता. दोन्ही देशांच्या मुत्सद्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यानही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
या प्रकरणावर दोन्ही देश योग्य तो मार्ग काढत नाहीत, तोपर्यंत १० जवानांच्या सुटकेबाबतची माहिती सार्वजनिक करायची नाही असा विचार दोन्हीकडील पक्षांनी केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने या हिंसाचारानंतर कोणताही भारतीय जवान बेपत्ता झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, चीन ताब्यात घेतलेल्या जवानांना सोडून देईल याची खात्री दिल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय जवान बेपत्ता नसल्याचे म्हटले होते, असे सूत्रांच्या हवाल्याने ‘द प्रिंट’ने वृत्त देताना म्हटले आहे.
यापूर्वी भारताकडून आपले काही जवान बेपत्ता असल्याचे वृत्त नाकारण्यात आले होते. तर चीननेही शुक्रवारी आपल्या ताब्यात एकही भारतीय सैनिक नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, भारत आणि चीनदरम्यानचे संबंध सुधारण्याच्या उद्देशाने लष्करी स्तरावर आणि मुत्सद्दी स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेकदा चर्चा झाल्या. आता लवकरच भारत तीन सीमावादाबाबतही दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू होणार आहेत. मात्र, गलवान खोऱ्यातील घटनेला भारतच पूर्णपणे जबाबदार असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी पत्रकार परिषदेत केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”