India Global Forum UAE 2022 : भारत युएई यांच्यातील मैत्रीचे संबंध बदलत्या जगाला आकार देतील – परराष्ट्रमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यामधील संबंध दिवसेंदिवस अधिक मैत्रीपूर्ण बनत आहेत. चांगले प्रशासन, दोन्ही देशांतील सहिष्णुतेच्या तत्वावर आधारित राजकारण अन आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याचा दोन्ही राष्ट्रांचा ध्यास यामुळे भारत अन यूएई यांच्या जागतिक राजकारणातील प्रभाव वाढताना दिसत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी (12 डिसेंबर) दुबईमध्ये ‘इंडिया ग्लोबल फोरम UAE 2022’ चे उद्घाटन केले. यावेळी बोलताना एस जयशंकर म्हणाले की, भारत आणि यूएई हे दोन देश एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. त्यामुळे भारत युएई यांच्यातील मैत्रीचे संबंध बदलत्या जगाला आकार देतील.

पुढील पाच चालणाऱ्या या कार्यक्रमात भारताचे G20 अध्यक्षपद, UAE चे COP 28 चे आयोजन, सध्याचे बदलणारे भूराजकीय वातावरण, जागतिक व्यापार, अर्थव्यवस्था अन स्थैर्यावरील त्यांचा प्रभाव आदींवर चर्चा होणार आहे. तसेच यावेळी हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत सहकार्याच्या संधी यावरदेखील सहभागी देशांमध्ये चर्चा होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या उदघाटन सत्रात, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, भारत-यूएई संबंधांना मी निश्चितच उच्च स्थानी मानतो. आम्ही सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार लवकर पूर्ण करू शकलो आणि त्यानंतर त्याचे प्रभावी परिणाम दोन्ही देशांसमोर आले. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, आज आमची चर्चा अंतराळ, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य आणि स्टार्टअप्सबाबत आहे. जुन्या, पारंपारिक ऊर्जा व्यवसायातील गुंतवणूक सुरूच आहे, परंतु एक नवीन अजेंडा देखील उदयास येत आहे.

UAE मधील संबंध अधिक दृढ होतील

भारताला G-20 चे अध्यक्षपद मिळाल्यानंतरची ही पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय सभा आहे. हा कार्यक्रम 12 ते 16 डिसेंबर दरम्यान दुबई आणि अबुधाबी येथे आयोजित केला गेला आहे. भारताने 1 डिसेंबर रोजी औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. या पाच दिवसीय कार्यक्रमात, आव्हानात्मक भौगोलिक-राजकीय परिस्थितींमध्ये भारताच्या जागतिक आकांक्षा आणि G-20 चे अध्यक्षपद यावर चर्चा केली जाईल. या कार्यक्रमामुळे भारत आणि UAE मधील संबंध अधिक दृढ होतील.