दिल्ली प्रतिनिधी । देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वातावरण पेटलं असून स्वतःला ताकदवान समजणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे लाडके मित्र गृहमंत्री अमित शहा मात्र मागील दोन दिवसांपासून मूग गिळून गप्प बसल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत मानवाधिकाराचं उल्लंघन करत असल्याच्या चर्चा सुरु असताना मोदी-शहांचं डोकं ठिकाणावर आहे का? असं म्हणण्याची वेळ सामान्य भारतीय नागरिकांवर आली आहे. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा टिमका मिरवणाऱ्या भारताची दिवसेंदिवस नाचक्की होत चालली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला राज्यसभेत आणि लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर धार्मिक आधारावर हा कायदा देशाची नागरिकता ठरवत असल्याच्या निषेधार्थ देशभरातून लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली. देशभरातील मूठभर लोकांची ही मानसिकता नसून देशाच्या वेगवेगळ्या भागातून या कायद्याचा तीव्र निषेध करण्यात आल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.
आसाममध्ये भाजपच्या सोबत असणाऱ्या पक्षानेही या कायद्याला विरोध केला आहे. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या स्टालिन यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याची प्रत फाडून टाकली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससहित शिवसेनेने सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला असून या कायद्याला विरोध करणाऱ्यांवर जर असेच अत्याचार होणार असतील तर हिंदू लोकच तुम्हाला क्षमा तुम्हाला करणार नाहीत असा नाराजीचा सूर लोकांमधून उमटत आहे. जनता दल युनायटेडच्या प्रशांत किशोर यांनीही या कायद्याला नकार दर्शवला आहे. ममता बॅनर्जी यांनी आपण राज्यात एनआरसी आणि कॅब कायदा लागू करणार नसल्याचं सांगितलं आहे. लोकांमधील भावना तीव्र असताना देशभरातील विद्यार्थी संघटनाही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.
या आंदोलनाची तीव्रता उत्तर प्रदेशमधील अलिगढ युनिव्हर्सिटी, दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी या ठिकाणी वाढली असून या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. मागील ३ दिवस शांततापूर्ण मार्गाने विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ले सुरु केले असून विद्यार्थ्यांना पोलिसांच्या अमानुष अत्याचाराला बळी पडावं लागत आहे. देशातील मुस्लिम समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याची भूमिकाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ पोलिसांनी असून याठिकाणची ग्रंथालये , अभ्यासिका फोडून टाकण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आमच्यावर हल्ला करत असल्याचा बनाव दिल्ली पोलीस करत असून पोलिसांनी स्वतःच विद्यार्थ्यांच्या गाड्या फोडल्याचं, वाहनं जाळल्याचं अनेक व्हिडियोजमधून समोर आलं आहे.