नवी दिल्ली । देशभरात कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे ४ टप्पे पार पडले तरी स्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत आजही वाढ नोंदवली जात आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी ८ हजारांहून अधिक संख्येने वाढले. मागील २४ तासांमध्ये देशात ८ हजार १७१ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा वेग असाच कायम राहिला तर येत्या २ दिवसात देशात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांचा टप्पा गाठेल.
कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या १० देशांमध्ये भारत ७ व्या क्रमांकावर आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवड्यापूर्वी भारत ९ व्या क्रमांकावर होता. आता मात्र देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.मागील २४ तासांत देशात २०४ जण कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५ हजार ५९८ जणांचा बळी गेला आहे.
समाधानकारक बाब म्हणजे देशात ९५ हजार ५२६ जणांनी कोरोनाचा पराभव केला आहे. तर ९७ हजार ५८१ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. १८ मे रोजी हे प्रमाण ३८.२९ टक्के होते.आतापर्यंत ३८ लाख ३७,२०७ नमुना चाचण्या झाल्या असून दररोज १ लाख चाचण्या करता येणे शक्य झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”