नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी इंग्लंडमधील साउथहॅम्पटन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या लढतीवर संपूर्ण जगाचे लक्ष असेल आणि चाहते देखील या लढतीची आतुरतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
यामध्येच आता भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफर याने एक ट्विट केले आहे जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहे. वासीम जाफरने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंपायर कोण असावेत यासंदर्भात त्याचे मत व्यक्त केले आहे. वासीम जाफरने आपल्या ट्विटमध्ये अंपायर रिचर्ड कॅटलबर्ग आणि कुमार धर्मसेना यांचे फोटो शेअर करून एक पोस्ट शेअर केली आहे. वासीम जाफरने फायनल मॅचमध्ये रिचर्ड यांना अंपायरिंग दिली जाऊ नये. तर अंपायर म्हणून कुमार धर्मसेना यांना घेतले जावे असे मत व्यक्त केले आहे.
.@ICC #WTCFinal 😉 pic.twitter.com/qdKPXgf1LG
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 24, 2021
वासीम जाफरने रिचर्ड कॅटलबर्ग यांच्या फोटोसह स्वत:चा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये वासीम जाफर रिचर्ड कॅटलबर्ग यांच्याकडे चेहरा फिरवताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत कुमार धर्मसेना यांच्या फोटोकडे यांची निवड करावी असा इशारा देताना दिसत आहे. फायनल मॅचसाठी जाफरने कॅटलबर्ग यांना नकार आणि धर्मसेना यांना होकार याचे कारण म्हणजे कॅटलबर्ग यांनी जेव्हा जेव्हा भारतीय संघाच्या आयसीसी नॉक-आउट सामन्यात अंपायरिंग केली आहे तेव्हा टीम इंडियाला एकपण सामना जिंकता आला नाही. तर कुमार धर्मसेना यांनी २०१९च्या वर्ल्डकपमध्ये अंपायरिंग केली होती आणि न्यूझीलंडला या सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता.