पँगाँग टीएसओ परिसरातून चिनी सैन्याला माघार घ्यावीच लागेल, नाही तर..

लडाख । भारतीय आणि चिनी कंमाडर्समध्ये मंगळवारी शेवटच्या फेरीची चर्चा झाली. त्यावेळी भारतीय लष्कराने चिनी सैन्य अधिकाऱ्यांना घुसखोरी केलेल्या पँगाँग टीएसओ परिसरातून मागे हटावेच लागेल, हे स्पष्ट केले आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ एप्रिलच्या मध्यमामध्ये जी स्थिती होती, तशी ‘जैसे थे’ परिस्थिती कायम करावीच लागेल, हे चिनी सैन्य अधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मंगळवारी दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्दायंवर प्रदीर्घ चर्चा झाली. तब्बल १५ तास ही बैठक चालली. चिनी सैन्याने घुसखोरी केलेल्या प्रदेशातून मागे फिरलेच पाहिजे, त्यावर कुठलीही तडजोड होणार नाही हे भारतीय सैन्याने चीनला स्पष्टपणे सांगितले आहे.

नियंत्रण रेषेजवळील देपसांगचा भागही आमच्या हद्दीमध्ये येतो असा चीनचा दावा आहे. तिथे सुद्धा चिनी सैन्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. भारत आपल्या सैन्यबळाचा वापर करु शकतो, त्या दृष्टीने लष्करही सज्ज आहे हा अप्रत्यक्ष इशारा चीनला देण्यात आला आहे. पूर्व लडाखमधील परिस्थिती सुधारण्याची जास्तीत जास्त जबाबदारी आता चीनवर आहे असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी जवानांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांचं मनोबलही वाढवलं. तसंच चीनलाही कठोर शब्दात इशारा दिला. “भारताच्या एक इंचही जमिनाला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही,” असं ते यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”