घरी बसून असलेल्या टीम इंडियाला फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने तयार केला ‘हा’ मास्टर प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला क्रिकेट ठप्प असल्याने टीम इंडियाचे सर्व क्रिकेटपटू आपल्या घरामध्येच आहेत. त्यामुळे त्यांना आता फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी एक प्लॅन बनवला आहे. त्यानुसार सर्व खेळाडूंना एकत्रित आणून त्यांचे सराव शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. कारण जोपर्यंत फिटनेस आणि सराव सुरु होत नाही, तोपर्यंत भारतीय संघ कोणताही सामना खेळू शकत नाही. त्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचे ठरवले आहे.

हा आहे प्लॅन
सध्याच्या घडीला भारतामध्ये मान्सून सुरु झाला आहे. त्यामुळे भारताला या २-३ महिन्यांमध्ये मैदानात सराव करता येणार नाही. त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये खेळाडूंना एकत्रितपणे मैदानात उतरवण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. खेळाडूंना ४ चरणांमध्ये खेळाडूंसाठी फिटनेस आणि सराव कसा करावा हे सांगण्यात येणार आहे.

दरम्यान, खेळाडूंना नेमके कुठे एकत्रित आणणार, याबाबत अजूनही काही निश्चित धोरण ठरवण्यात आलेले नाही. कदाचित भारतीय संघातील सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एकत्रित आणले जाऊ शकते, पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा अजून मिळालेला नाही. कारण सध्याच्या घडीला देशातील वाहतूक पूर्णपणे सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे जर सर्व खेळाडूंना एका ठिकाणी जमायचे असेल तर समस्या होऊ शकते. पण सप्टेंबरपर्यंत हा प्रश्न निकाली निघेल, असे म्हटले जात आहे.

म्हणून बीसीसीआयने तयार केला फिटनेस प्लॅन
कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयपीएल २९ मार्चपासून सुरु होणार होते. पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएलही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले. त्यामुळं गेल्या २ महिन्यांपासून खेळाडू आपल्या घरीच आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यांचा फिटनेस हा स्पर्धा खेळण्यासाठी योग्य नसावा या विचारातून बीसीसीआयने सर्व खेळाडूंना एकत्रित आणून त्यांचे सराव शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”