नवी दिल्ली । जवळजवळ प्रत्येकाकडे रंगीत नोटा आहेत. पण या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो हे फार कमी लोकांना माहिती असेल. तुमच्या खिशातही 100, 50, 500, 2000 रुपयांच्या रंगीत नोटा आहेत का? त्यांना छापण्यासाठी किती पैसे लागतात हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेउयात की नोटा कोण देते, कोण छापते, किती नोटा छापल्या जातात आणि त्याची किंमत किती आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) भारतात चलन जारी करण्याचा अधिकार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, RBI नोटा छापण्यासाठी मिनिमम रिझर्व्ह सिस्टीमचे नियम पाळते. हा नियम 1956 साली बनवण्यात आला. रिझर्व्ह बँकेला नेहमी चलनी नोटांच्या छपाईसाठी किमान 200 कोटी रुपयांचे रिझर्व्ह ठेवावे लागते. यामध्ये 115 कोटी रुपयांचे सोने आणि 85 कोटी रुपयांचे विदेशी चलन ठेवणे आवश्यक असते.
सध्या देशात 2000, 500, 200, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. 2016 मध्ये नोटाबंदीपासून एक हजाराच्या नोटा चलनात नाहीत.
पाच रुपयांची पहिली नोट छापली गेली
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. म्हणजेच त्याची स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच झाली होती. 1938 मध्ये, स्थापनेच्या तीन वर्षानंतर, जानेवारी महिन्यात, RBI ने पहिल्यांदा 5 रुपयांची चलनी नोट जारी केली. या नोटवर किंग जॉर्ज VI चे छायाचित्र छापण्यात आले होते. म्हणजे स्वातंत्र्याच्या 9 वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पहिले चलन जारी केले होते. यानंतर, मार्चमध्ये 10 रुपयांच्या नोटा, 100 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या आणि जूनमध्ये 1000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.
कोणती नोट छापण्यासाठी किती खर्च येतो?
प्रत्येक नोटा छापताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खर्च वेगळा असतो. RBI ला 200 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी प्रति नोट 2.93 रुपये खर्च करावे लागतात. 200 रुपयांच्या नोटेवर सांची स्तुपाचे छायाचित्र छापलेले आहे. तसेच 500 रुपयांची नोट छापण्यासाठी प्रति नोट 2.94 रुपये खर्च येतो. या नोटवर लाल किल्ल्याचे छायाचित्र छापलेले आहे.
त्याचप्रमाणे 2000 रुपयांच्या नोटा छापण्यासाठीचा खर्च 3.54 रुपये प्रति नोट येतो. ही देशातील सर्वात मोठी नोट आहे. मंगळयानचे छायाचित्र त्यावर छापलेले आहे. नोटाबंदीनंतर RBI ने ती जारी केली होती. या नोटेपूर्वी 1000 रुपयांची नोट होती, जी नोटाबंदीच्या वेळी बंद करण्यात आली.