हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) विभागात मोठ्या प्रमाणात भविष्यात उपयोगाला न येणाऱ्या वस्तू रेल्वे ट्रॅक व रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला पडलेल्या असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकाची शोभा जाते. त्याच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रेल्वे विभागाची नाच्चक्की होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने रेल्वे ट्रॅक व स्थानकातील पडलेल्या अनावश्यक वस्तू भंगारात घालण्याचे एका विशिष्ट अभियानाअंतर्गत ठरवले. या मोहिमेच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत भंगार विकून सुमारे 66.83 लाख रुपयांची कमाई केली.
रेल्वे विभागात स्वच्छतेसाठी कॅम्पेन 3.0 : (Indian Railways )
सध्या रेल्वे विभागात स्वच्छतेसाठी कॅम्पेन 3.0 सुरु करण्यात आले आहे. हे अभियान संपूर्ण ऑक्टोबर महिना चालणार असून मुख्यत्वे हे अभियान महात्मा गांधी जयंतीपासून सुरु करण्यात आले आहे व ते ऑक्टोबर महिन्याचा अखेरपर्यंत चालवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांची स्वच्छता तसेच रेल्वे विभागाची अडकून पडलेली जागा मोकळी करण्यात येणार आहे.त्यासाठीच हे मिशन राबवण्यात आले आहे.
रेल्वेची 397619 चौरस फूट जागा रिकामी:
रेल्वे विभागाच्या (Indian Railways)अंतर्गत सुरु असलेल्या स्वच्छता कॅम्पेन 3.0 च्या माध्यमातून आत्तापर्यंत मोठया प्रमाणात रेल्वे विभागातील भंगार विकण्यात आले आहे. रेल्वेने विकलेल्या भंगार वस्तूच्या माध्यमातून जवळपास 66.83 लाख रुपये उत्पन्न जमा केले आहे. रेल्वे विभागातून भंगार वस्तू विकल्यामुळे रेल्वेची 397619 चौरस फूट जागा रिकामी करण्यात रेल्वेला यश आले आहे. भविष्यात रिकाम्या झालेल्या या जागेचा सुयोग्य उपयोग रेल्वेला करता येईल.