नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली असली तरी भारताचा विकास दर 7.5 टक्के राहू शकेल तर दक्षिण आशियाचा विकास दर एकूण 7 टक्के राहील. आशियाई विकास बँकेने चालू वर्ष 2022 साठी असा अंदाज वर्तवला आहे.
एशियन डेव्हलपमेंट आउटलुक 2022 जारी करताना ADB ने म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर या वर्षी 7.5 टक्के अपेक्षित आहे, तर पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये तो 8 टक्के असू शकेल. बँकेच्या म्हणण्यानुसार 2022 मध्ये संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास दर मंद असेल. भारत दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. ADB म्हणते की, या प्रदेशाचा विकास मुख्यत्वे भारत आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.
दक्षिण आशियाचा विकास दर 7 टक्के असेल
ADB ने Asian Development Outlook (ADO) मध्ये म्हटले गेले आहे की, 2022 मध्ये संपूर्ण दक्षिण आशियाई देशांचा विकास दर 7 टक्के असेल. 2023 मध्ये ते 7.4 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ADO च्या रिपोर्टमध्ये 2022 मध्ये पाकिस्तानचा विकास दर 4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, कमकुवत देशांतर्गत मागणीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची गती मंद राहू शकते. 2023 मध्ये ते 4.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज ADB ने व्यक्त केला आहे.
मात्र, संपूर्ण आशियाई देशांमध्ये देशांतर्गत मागणी सुधारली आहे आणि निर्यात वाढत आहे, असा ADB चा विश्वास आहे. हे पाहता, या वर्षात म्हणजे 2022 मध्ये, विकसनशील आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था एकत्रितपणे 5.2 टक्के वेगाने वाढतील. 2023 मध्ये हा विकास दर 5.3 टक्के राहण्याचा अंदाज ADB ने व्यक्त केला आहे.