इंदूर : वृत्तसंस्था – खूप तपास करूनही आरोपीचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांनी एक अफवा पसरवली आणि आरोपी बरोबर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. एका बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात कुठलाही पुरावा मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी एक अफवा पसरवली. हि घटना CCTV त कैद झाल्याची ती अफवा होती. ते ऐकून नेमके कुठे सीसीटीव्ही लागले आहेत, हे पाहण्यासाठी आरोपी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
काय आहे प्रकरण
२८ एप्रिल २०२१ ला इंदुरजवळच्या मांगलिया गावातील रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. रेल्वे खाली आल्याने तरूणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. पोस्टमार्टमधून समोर आलं की, मृत्यूआधी तरूणीवर रेप करण्यात आला होता.रेल्वेशी संबंधित असल्याने प्रकरणाचा तपास जीआरपी करत होते. जीआरपीला या केसमध्ये काहीच पुरावे सापडत नव्हते. चौकशी दरम्यान केवळ इतकंच समजलं की, ज्या गावाजवळ ही घटना घडली तिथे यूपीच्या ललितपूरमधील काही तरूण भाड्याने राहत होते आणि ते घटनेनंतर फरार होते.
पोलिसांनी असा आखला प्लॅन
आरोपींना जाळ्यात पकडण्यासाठी पोलिसांनी एक कल्पना लढवली. या तरुणीसोबत झालेल्या अत्याचाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचं फुटेज पोलिसांना मिळालं असल्याची अफवा गावात पसरवण्यात आली. यानंतर आरोपीपर्यंत ही अफवा पोहोचल्यानंतर हा सीसीटीव्ही कॅमेरा नेमका कुठं लावला आहे, हे पाहण्यासाठी तो घटनास्थळी गेला असता या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, त्याने तरूणीची हत्या केली नाही. ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. त्याने लग्नास नकार दिल्यामुळे तिने रागाच्या भरात रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.