हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) आपल्या एका कीर्तनातील वक्तव्यामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असं विधान त्यांनी केलं होत. यांच्या या विधानाचा कीर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर इंदुरीकरांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या कीर्तनातून सतत महिलांविरोधात बोलत असतात. महिलांची बदनामी करत असतात, त्यामुळे त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे. त्यांनी पुत्रप्राप्तीबाबत केलेलं वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांना या प्रकरणी नोटीसही बजावली.
या सगळ्या प्रकारानंतर इंदुरीकर महाराजांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या चार दिवसात मला प्रचंड मनस्ताप झाला आहे. जर हे थांबलं नाही तर मी कीर्तन सोडून शेती करेन असे इंदुरीकर महाराजांनी केलं आहे.पुत्रप्राप्तीबाबत मी जे काही बोललो ते काही ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. मात्र जो काही वाद झाला त्यामुळे मला खूप त्रास झाला. दोन दिवसात माझं वजनही कमी झालं आहे. दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं असं स्पष्टीकरण देत हे सगळं थांबलं नाही तर कीर्तन सोडून शेती करेन अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली आहे.दरम्यान, इंदुरीकर यांची बदनामी करणारे व्हिडिओ युट्यूबसह इतर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांविरोधात पुणे सायबर शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुरीकर यांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.