विविध रंगाना सामावून घेणारा रंगाचा सण म्हणजे होळी !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारताची ओळख ही सर्वसमावेशक राष्ट्राची आहे. असंख्य भाषा, जाती, धर्म, संप्रदाय, संस्कृती, चालीरिती, उत्सव, सण, परंपरा यांचा मोठा आणि समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. आपल्या देशांत विविधता आहे पण त्यांत एकता आहे. निदान तशी ती आहे असं आपण म्हणत आलोय. सध्या मात्र या विविधतेला विस्कटण्याचं आणि एकतेला तोडण्याचं काम सुरू आहे. तुम्ही सुज्ञ लोक आहात त्यामुळे मी काय म्हणतोय ते सांगणे नलगे. विविध रंगांत रंगलेल्या भारताला आणि भारतीयत्वाला एकाच रंगात रंगवण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे. ही दुःखाची गोष्ट आहे. आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे. एकरंगा नाही, ही जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि जपलीही पाहिजे.

या रंगबेरंगी भारताचं, इथल्या विविधतेचं, यातल्या एकतेचं प्रतीक जर कोणत्या सणाच्या रुपानं सांगायचं म्हटलं तर त्याची सुदैवाने अनेक उदाहरणं आपल्याला मिळतील. पण त्यांतही मी होळीला हा मान देणार आहे. त्याची कारणं आहेत. होळी हा मूळात रंगोत्सव आहे. तो आनंदाचा उत्सव आहे. उन्हाळा सुरू होण्याआधी अंगाची वाढती काहिली शांत करण्यासाठी अंगावर पाण्याचा थंड शिडकावा मारण्याचा हा सण आहे. तो जणू सांगतो की संतापू नका, शांत रहा. आयुष्यात कठीण प्रसंग येतील, तापदायक घटना घडतील, पण डोकं थंड ठेवा. उन्हाळ्यात सगळीकडे रखरखाट पसरला असला तरी या रंगांच्या माध्यमातून जगण्यातले रंग जीवंत ठेवा, जपा.

होळीच्या दिवशी आपण रंगांची उधळण करतो. त्या रंगांचही महत्त्व आहे. आयुष्य एकरंगी नसतं हे ते आपल्याला सांगतात. आणि एकमेकांच्या सोबतीनं जगण्याचा रंग अधिक खुलून उठतो हे देखील. कोणत्याही जाती धर्माच्या वयाच्या लिंगाच्या रुपाच्या आर्थिक सामाजिक राजकीय भेदभावाच्या काळ्या कोरड्या रंगांना यांत स्थान नसतं. सुरेश भट लिहितात, रंगांत रंगूनी साऱ्या रंग माझा वेगळा. मी त्यांत थोडी सुधारणा करून म्हणेन, रंगांत रंगूनी साऱ्या रंग माझा एकला. आणि तो आहे प्रेमाचा रंग. सौहार्दाचा रंग. भारतीयत्वाचा रंग. माणूसकीचा रंग.

होळीच्या दिवशी काही ठिकाणी शिमगा साजरा केला जातो तेव्हा लोक बोंब ठोकतात. ती काहीशी अश्लील असते. शिवराळ असते. पण त्यामागे एक अर्थ आहे. मानसिक संताप मोकळा करण्याचा तो प्रकार आहे. आपल्या मनातील सारा राग बाहेर काढण्याची ती एक सोय आहे. इतरांविषयी द्वेष असेल तर तोही बाहेर काढायचा. जेणेकरून आपलं मन शांत राहिल. आणि पुढे वर्षभर आपण शांतपणे जगू शकू. बुरा न मानो होली है, हे त्यासाठीच म्हणतो आपण.

होळीच्या दिवशी होळी जाळण्यालाही असाच काहीसा अर्थ आहे. होळी करायची ती वाईट विचारांची करायची. वाईट चालीरितींची करायची. एकमेकांविषयी अढी असेल, द्वेष असेल, गैरसमज असतील, असूया असेल या सर्वांची होळी करायची आहे. कुटुंबात, समाजात, देशांत प्रेमभाव नांदावा, शांती राहावी यासाठी आपल्या मनांतील सर्व चुकीच्या भावना या होळीत जाळायच्या आहेत.

होळीचे रंग हे आयुष्याचे रंग आहेत. जगण्याचे रंग आहेत. त्यांची सदा उधळण करायची आहे आपल्याला. होळी हे त्याचं केवळ एक निमित्त आहे. जगण्यात एकच रंग असेल तर आयुष्य एकरंगी एकसुरी भकास भयाण वाटतं. रंग आहेत म्हणून या जगण्यात आनंद आहे. म्हणून जगण्यातच नव्हे तर आपल्या विचारांतही अनेक रंग हवेतच. ज्यांना जो रंग आवडेल त्यानं तो रंग निवडावा. पण आपल्या रंगाची इतरांवर जबरदस्ती करू नये. माझाच रंग चांगला तुझा वांगला असा हट्ट करू नये. एकाच रंगात इतर सर्वांना रंगवण्याचा उद्दामपणा करू नये.

होळी हा त्यासाठीच मला राष्ट्रीय सण वाटतो. कारण तो आनंदाचा सण आहे. माणसांचा व त्यांच्या माणूसकीचा सण आहे. तो केवळ हिंदूंचा सण नाही. तो प्रत्येक जातीधर्माचा सण आहे. यालाही गालबोट लावणारे लोक असतातच. पण त्यांच्याकडे दूर्लक्ष करा. त्यांना आज ना उद्या समजेल ही आशा बाळगा. द्वेष बाळगू नका. कारण मी स्वतः आजवर कोणत्याही होळीत हा द्वेषाचा रंग उधळला नाही, इतरांनी तो उधळल्याचं पाहिलं नाही. आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या देशाचा ध्वज तिरंगा आहे, त्यांत मला होळीचा भास होतो. ते आपलं प्रतीक आहे.

होळी यायला अजून बराच अवधी आहे मग हे सारं सांगण्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण आपण सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो लाखो लोकांनी आपल्या आयुष्याची होळी पेटवली आहे त्याची आठवण राहावी म्हणून हे लिहितोय. त्यांनी आपल्या रक्ताचा लाल रंग उधळला, आपल्या विचारांचा गुलाल उधळला, म्हणून हे स्वातंत्र्य आपल्याला लाभलंय. याचा विसर आपल्याला पडायला नको. भारताचं हे विविधरंगी आकाश काळवंडणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आहे.
– प्रतिक पुरी