Friday, January 27, 2023

खिद्रापूर येथील प्राचीन श्री कोपेश्वर मंदिर! कशी आहे त्याची संरचना ?

- Advertisement -

शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तुंची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्ये, तथ्ये ऐकली, तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचे हे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.

कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

- Advertisement -

साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही.

मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्याला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत. स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत.

या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे.

संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन-पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे. कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत.

या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पहायला मिळतात. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
– प्रतिक पुरी

माहिती संदर्भ : मराठी विश्वकोश, इंटरनेट